
५ किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत भेंडाळा येथील विद्यार्थ्याने उंचावला महाविद्यालयाचा नावलौकिक

प्रतिनिधी भेंडाळा:
तालुकास्तरीय शालेय ॶॅथलेटिक्स स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विश्वशांती महाविद्यालय, भेंडाळा येथील इयत्ता नववीतील विद्यार्थी मनीष मोरेश्वर साखरे याने ५ किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तालुकास्तरीय शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेत मनीषने जिद्द, चिकाटी, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत अव्वल स्थान मिळविले. कमी वयात क्रीडा क्षेत्रात मिळविलेल्या या यशामुळे त्याच्या पुढील क्रीडा कारकिर्दीबाबत आशा व्यक्त केली जात आहे.
जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशाला गवसणी!
क्रीडा क्षेत्रात यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण सराव, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक खंबीरपणा आवश्यक असतो. मनीषने आपल्या कामगिरीतून या गुणांचे दर्शन घडविले आहे. त्याच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपले कौशल्य सिद्ध करण्याची प्रेरणा मिळणार आहे.
विश्वशांती महाविद्यालय, भेंडाळा येथील या गुणवंत विद्यार्थ्याच्या यशाबद्दल शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मित्रपरिवार आणि क्रीडाप्रेमींनी त्याचे अभिनंदन केले असून, पुढील स्पर्धांमध्येही त्याने अशीच उज्ज्वल कामगिरी करावी, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

