
वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, निबंध-चित्रकला स्पर्धा आणि जनजागृती उपक्रमांतून वनसंवर्धनाचा संदेश

एटापल्ली : वन्यजीव संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने वनपरिक्षेत्र कार्यालय, एटापल्ली यांच्या वतीने सात दिवसीय वन्यजीव सप्ताह विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांना वन्यजीव संरक्षण आणि निसर्ग संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
वन्यजीव सप्ताहांतर्गत एटापल्ली येथील विक्री आगार परिसरात गावातील प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वनविभागाच्या परिसरात वनकर्मचाऱ्यांनी श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धन आणि परिसर स्वच्छतेचे महत्त्व या उपक्रमांतून अधोरेखित करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी एटापल्ली येथील विविध शाळांमध्ये वन्यजीव विषयावर निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय, एटापल्ली येथील वनस्पतीशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी रोपवाटिका या विषयावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना रोपवाटिका निर्मिती व वनस्पती संवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
वनसंवर्धन आणि जलसंधारणाच्या दृष्टीने वनकर्मचाऱ्यांनी श्रमदानातून कृष्णार येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी केली. यामुळे जलसंधारणाच्या कामाला हातभार लावण्यासोबतच पाण्याचे महत्त्व आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला.
वनपरिक्षेत्रातील विविध गावांमध्ये तसेच ग्रामसभांच्या माध्यमातून वन्यजीव संवर्धन, वन्यप्राण्यांचे संरक्षण आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्व याबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले. स्थानिक नागरिकांना वन व वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी सहअस्तित्वाची भावना जोपासण्याचे आवाहनही करण्यात आले.
वन्यजीव सप्ताहाच्या समारोपप्रसंगी एटापल्ली गावातून शालेय विद्यार्थी आणि वनकर्मचाऱ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. सप्ताहादरम्यान आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करून त्यांचे कौतुक करण्यात आले.
भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. शैलेश मिना यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एटापल्ली श्रीमती निलिमा खोब्रागडे तसेच वनपरिक्षेत्रातील सर्व वनकर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा सप्ताह यशस्वीरीत्या पार पडला.
वन व वन्यजीवांसह जैवविविधतेचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे. निसर्गाचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वनसंवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हावे, हा महत्त्वपूर्ण संदेश वन्यजीव सप्ताहाच्या विविध उपक्रमांतून देण्यात आला.

