
नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली

चंद्रपूर : मतदार यादीतील कथित गैरप्रकार आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने आज चंद्रपुरात निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि हजारो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले.
काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी मतदार यादीतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्ली येथे या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेस खासदारांशी प्रशासनाने केलेल्या कथित गैरवर्तनाचा निषेधही यावेळी करण्यात आला.

निवडणूक प्रक्रिया ही निष्पक्ष, पारदर्शक आणि लोकशाही मूल्यांनुसार असणे आवश्यक आहे. मतदार यादीतील कथित घोळाबाबत जनतेसमोर वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या निषेध मोर्चात खासदार प्रतिभाताई धानोरकर,चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, आमदार अभिजीतदादा वंजारी, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवा राव, गडचिरोली माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, दिनेश पा. चोखारे, शांतनु धोटे, चिमूर तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय गावंडे, नागभीड तालुका अध्यक्ष प्रमोद चौधरी, जुनेद खान, राम राऊत, विजय घरत, पुरुषोत्तमजी बघमारे, महेश कुर्जेकर, पंकज गाडीवार यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

