
अनियमित पाणीपुरवठ्याची प्रशासनाकडून दखल; ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून चौकशीचे आदेश

नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
चामोर्शी : तालुक्यातील आंबोली, वायगाव आणि कन्हाळगाव येथील नागरिकांना गेल्या काही काळापासून नियमित व सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने निर्माण झालेल्या गंभीर पाणीप्रश्नाची अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे. नागरिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संबंधित नळ पाणीपुरवठा योजनांची मौका चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

या गावांतील पेयजल योजनांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ .मिलिंद नरोटे तसेच अरुण कुकुडकर यांनी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग चामोर्शी यांना पत्र देऊन आंबोली, वायगाव व कन्हाळगाव येथील नळ पाणीपुरवठा योजनांची प्रत्यक्ष मौका चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच चौकशीअंती पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल पूरक कागदपत्रांसह तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या पत्राची प्रत आमदार डॉ .मिलिंद नरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित ग्रामस्थ प्रतिनिधींनाही माहितीस्तव देण्यात आली आहे.
चौकशी कागदावरच राहणार की प्रत्यक्ष पाणी मिळणार?
पाणी हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक प्रश्न असताना नळाला नियमित पाणी मिळत नसल्याने या तीनही गावांतील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने चौकशीचे आदेश दिल्याने ग्रामस्थांच्या अपेक्षा उंचावल्या असल्या, तरी केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष दोष दूर करून नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
आता प्रशासनाच्या चौकशीत नेमक्या कोणत्या त्रुटी समोर येतात आणि त्यानंतर प्रत्यक्षात पाणीपुरवठा कितपत सुरळीत होतो, याकडे आंबोली, वायगाव आणि कन्हाळगावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

