
अमोल मारकवार | तालुका प्रतिनिधी

अहेरी | दि. ८ ऑक्टोबर २०२६ : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपाइं-पीरिपा महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांच्या प्रचारार्थ अहेरी येथे पदवीधर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. इंडियन पॅलेस फंक्शन हॉल, महागाव रोड, अहेरी येथे झालेल्या या मेळाव्यास पदवीधर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सर्व प्रथम कार्यक्रम सुरू होण्यापुर्वी सिनेसृष्टीचे अभिनेते तथा नटसम्राट नाना पाटेकर यांना मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहली.
यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, अहेरी नगराध्यक्ष मोहूर्ले ताई, ज्येष्ठ नेते रवींद्र ओल्लालवार, प्रकाश गुड्डेलीवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता, विनोद आकनपलीवार, अहेरी तालुकाध्यक्ष विकास तोडसाम, मुलचेरा तालुकाध्यक्ष संजय सरकार, एटापल्ली तालुकाध्यक्ष प्रसाद जक्कुलवार, भामरागड तालुकाध्यक्ष अर्जुन आलाम, सिरोंचा तालुकाध्यक्ष श्रीकांत राऊत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : सुधाकर कोहळे
यावेळी महायुतीचे उमेदवार सुधाकरजी कोहळे यांनी पदवीधर मतदारांना संबोधित करताना सांगितले की, “पदवीधर मतदारसंघात काम करण्याची संधी मला द्यावी. पदवीधरांचे प्रश्न, शाळा संचालकांच्या समस्या तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे. माझ्यात काम करण्याची ताकद असून काम करून दाखविण्याची हिंमत आहे.”
“पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्व व आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून भाजप संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या असून पक्षाने माझ्यावर पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडेन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अहेरीशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याची ग्वाही देताना कोहळे म्हणाले, “अहेरीतील पदवीधरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी सातत्याने येथे येत राहीन. आपण दिलेला मतदाररूपी आशीर्वाद आणि विश्वासाचे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही.”
तसेच केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या प्रयत्नातून झालेल्या रस्ते विकासामुळे गडचिरोली ते अहेरी हा प्रवास अधिक सुलभ झाल्याचा उल्लेख करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’च्या संकल्पनेनुसार शिक्षित, सक्षम आणि रोजगारक्षम समाजनिर्मितीसाठी पदवीधरांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
“सुधाकर कोहळे अभ्यासू व सुशिक्षित व्यक्तिमत्त्व; विजयासाठी शुभेच्छा” : डॉ. अशोक नेते
माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सुधाकरजी कोहळे हे सुशिक्षित, अभ्यासू व सक्षम व्यक्तिमत्त्व असून पदवीधर मतदारसंघाच्या प्रश्नांची जाण असलेले उमेदवार आहेत, असे सांगितले.
“पदवीधरांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे सभागृहात मांडण्यासाठी आणि त्यांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी सुधाकरजी कोहळे यांच्यासारख्या अभ्यासू व कार्यक्षम नेतृत्वाची आवश्यकता आहे. आगामी निवडणुकीत त्यांना विजयी करून महायुतीला बळ द्यावे,” असे आवाहन डॉ. नेते यांनी केले. तसेच त्यांनी सुधाकरजी कोहळे यांना निवडणुकीतील विजयासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
माजी मंत्री राजे अमरीशराव आत्राम यांचा शुभेच्छा संदेश
दरम्यान, माजी मंत्री राजे अमरीशराव आत्राम हे कौटुंबिक कारणास्तव मेळाव्यास उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवून पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुधाकरजी कोहळे यांचा निश्चित विजय होईल आणि आपण त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
अहेरीतील या पदवीधर मेळाव्यामुळे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला बळ मिळाले असून, पदवीधर मतदारांशी थेट संवाद साधत विकास, रोजगार आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

