
बेडअभावी विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपण्याची वेळ; रिक्त पदे, स्वच्छता, आरोग्य व कर्मचाऱ्यांच्या व्यसनाचा मुद्दाही ऐरणीवर

नितेश गट्टीवार
गडचिरोली|चिमूर | :जांभूळघाट येथील आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या तब्बल ५७२ विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींची माहिती मिळताच शेतकरी नेते महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी आश्रमशाळेला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

जांभूळघाट आश्रमशाळेत ३०० मुले आणि २७२ मुली, असे एकूण ५७२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी असतानाही त्यांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा मिळत आहेत का, याची ब्राम्हणवाडे यांनी पाहणी केली. यावेळी पुरेसे बेड उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींनाही खाली झोपावे लागत असल्याचे निदर्शनास आले.
विद्यार्थ्यांच्या निवासाचा हा प्रश्न तातडीने सोडवून प्रत्येक विद्यार्थ्याला पुरेसे बेड उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
विद्यार्थ्यांनी मांडल्या व्यथा
पाहणीदरम्यान ब्राम्हणवाडे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. राहण्याची व्यवस्था, भोजन, स्वच्छता, आरोग्यसेवा आणि शाळेतील इतर सुविधांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली. विद्यार्थ्यांनीही आपल्या विविध अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा ब्राम्हणवाडे यांनी दिला.
कर्मचाऱ्यांच्या व्यसनाचा मुद्दा गंभीर
शाळेतील काही कर्मचारी व्यसनाच्या आहारी गेल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही ब्राम्हणवाडे यांनी केली. याशिवाय शाळेतील रिक्त पदे तातडीने भरावीत, स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आणि एका अधीक्षकावर असलेला अतिरिक्त कामाचा भार कमी करावा, अशी मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. नियमित आरोग्य तपासणी, आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर सातत्याने देखरेख ठेवण्याची गरज असल्याचे ब्राम्हणवाडे यांनी सांगितले.
अधिकारी पाहणीला का आले नाहीत?
आश्रमशाळेतील समस्यांची माहिती प्रशासनाला असतानाही संबंधित अधिकारी अद्याप प्रत्यक्ष पाहणीसाठी का आले नाहीत, असा सवाल उपस्थित करत महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी विभागीय आयुक्त आयुषी सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. आश्रमशाळेतील परिस्थितीची तातडीने चौकशी करून विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.
“५७२ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा, आरोग्याचा आणि भवितव्याचा प्रश्न आहे. प्रशासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी आणि हिताशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिला.
यावेळी प्रमोद चौधरी, राजू कापसे, अविनाश अगडे, प्रशांत डवले, मिलिंद खोब्रागडे, अमोल मालके, रोहन नन्नावरे, कुंदन पडवेकर, निखिल करमेंगे, स्वप्नील दोहतरे, हरीश मुळे, सूरज चौधरी, अमर नवघडे, हुकूमसिंग जुनी, बागवान डहारे, समीर कुळमेथे, मधुकर मुंगले, ज्योतीताई मुंगले, मंजूताई रामटेके यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

