
परवानग्यांअभावी कलाकारांसह नाट्यव्यवसायावर अवलंबून असलेल्यांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : गडचिरोली, चंद्रपूरसह पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांना झाडीपट्टी रंगभूमीचा समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या मनोरंजनासोबतच सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून झाडीपट्टी रंगभूमीने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दरवर्षी या भागात शेकडो नाट्यप्रयोगांचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा प्रशासनाकडून विविध कारणे पुढे करून नाट्यप्रयोगांच्या परवानग्या नाकारल्या जात असल्याने झाडीपट्टी रंगभूमीशी संबंधित कलाकार, नाट्यसंस्था आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नाट्यप्रयोगांना परवानगी द्यावी, अशी मागणी काँग्रेस नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.

झाडीपट्टी रंगभूमी ही पूर्व विदर्भाच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ग्रामीण भागातील रसिक प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देण्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक विषयांवर भाष्य करणारे नाट्यप्रयोग या रंगभूमीच्या माध्यमातून सादर केले जातात. ग्रामीण भागातील अनेक प्रतिभावान कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी झाडीपट्टी रंगभूमी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देते. त्यामुळे या रंगभूमीचे महत्त्व केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून ती स्थानिक कला, संस्कृती आणि रोजगारनिर्मितीशीही जोडलेली आहे.
झाडीपट्टी नाट्यव्यवसायाच्या माध्यमातून दरवर्षी शंभर कोटी रुपयांहून अधिक आर्थिक उलाढाल होत असून व्यवसायात केवळ कलाकारच नव्हे, तर नाटकांचे लेखक, दिग्दर्शक, संगीतकार, वादक, डेकोरेशन सह मंडप व्यावसायिक, वाहनचालक आणि इतर अनेक घटक सहभागी असतात. नाट्यप्रयोगांच्या आयोजनामुळे स्थानिक बाजारपेठेलाही चालना मिळते. परिणामी, या क्षेत्रातून हजारो लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात रोजगार मिळतो.
अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ वर्षभर झाडीपट्टी नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असतात. विशेषतः ग्रामीण भागातील कलाकारांसाठी हा व्यवसाय उपजीविकेचे महत्त्वपूर्ण साधन आहे. अशा परिस्थितीत नाट्यप्रयोगांच्या परवानग्या नाकारल्या गेल्यास त्याचा परिणाम केवळ नाट्यसंस्थांवर होत नाही, तर संपूर्ण नाट्यव्यवसायाशी संबंधित घटकांवर होतो. त्यामुळे परवानगी प्रक्रियेतील अडचणी दूर करून नाट्यप्रयोगांना प्रशासनाने रीतसर परवानगी द्यावी अशी मागणी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.
झाडीपट्टी रंगभूमी ही पूर्व विदर्भाची सांस्कृतिक ओळख असून तिच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी आपले जीवन घडविले आहे. त्यामुळे नाट्यप्रयोगांबाबत निर्माण झालेल्या अडचणी दूर करून कलाकार, नाट्यसंस्था आणि संबंधित व्यावसायिकांना न्याय मिळवून देणे आवश्यक आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे केवळ परवानगीच्या प्रक्रियेपुरते न पाहता, त्यामागे असलेल्या सांस्कृतिक परंपरेचा आणि हजारो लोकांच्या रोजगाराचा विचार करावा, असेही महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी स्पष्ट केले.

