
पिकअप वाहनासह देशी-विदेशी दारूचा मोठा साठा हस्तगत; अंधाराचा फायदा घेत चालक फरार

जिल्हा प्रतिनिधी| गडचिरोली
चामोर्शी: अवैध धंद्यांविरोधात आष्टी पोलिसांनी धडक कारवाई करत बेकायदेशीर देशी व विदेशी दारूच्या मोठ्या साठ्यासह चारचाकी पिकअप वाहन जप्त केले आहे. मौजा अड्याळ परिसरात केलेल्या या नाकाबंदी कारवाईत तब्बल १० लाख ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे.

नेमकी घटना काय?
येणापूर ते चामोर्शी मार्गावरून चारचाकी पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती आष्टी पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ९ ऑक्टोबरच्या रात्री मौजा अड्याळ शिवारात सापळा रचून नाकाबंदी लावली.
नाकाबंदीदरम्यान संशयित टाटा इंट्रा पिकअप (MH 34 BZ 2982) येताना दिसताच पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. परंतु, चालकाने रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
जप्त केलेला मुद्देमाल:
वाहनाची पाहणी केली असता त्यात विविध कंपन्यांची देशी व विदेशी दारू आढळून आली:
रॉकेट देशी दारू (९० मि.ली.): ३,९०० निपा (किंमत ₹ ३,१२,०००/-)
रॉयल स्टॅग व्हिस्की (१८० मि.ली.): ४८० निपा (किंमत ₹ १,९२,०००/-)
हेवॉर्ड्स ५०० बीअर (५०० मि.ली.): १२० कॅन (किंमत ₹ ३६,०००/-)
ऑल सीझन्स व्हिस्की (१८० मि.ली.): ४८ निपा (किंमत ₹ १९,२००/-)
एकूण दारूची किंमत: ₹ ५,५९,२००/-
टाटा इंट्रा पिकअप वाहन: ₹ ५,००,०००/-
एकूण जप्त मुद्देमाल: ₹ १०,५९,२००/-
चालकाचा शोध सुरू
पळून गेलेल्या वाहनचालकाविरुद्ध पोलीस स्टेशन आष्टी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा. एम. रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक मा. हर्षवर्धन बी. जे. (अहेरी), व उपविभागीय पोलीस अधिकारी मा. हेमंत चांदेवार (अहेरी) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ, पोलीस अंमलदार प्रकाश सिडाम, वैभवेडाऊ, आणि सुभाष वाकडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

