
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी
एटापल्ली (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंडुम गावाजवळ रविवारी नक्षलवाद्यांचे बॅनर व पत्रके आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाली असून संपूर्ण परिसरात व्यापक शोधमोहीम आणि तपास सुरू करण्यात आला आहे.
घटनास्थळी मिळालेल्या पत्रकांमध्ये स्वतःला माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पत्रकांद्वारे विविध खाण व औद्योगिक कंपन्यांविरोधात स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः ओम साईराम , नॅचरल रिसॉर्सेस कंपनी, सनफ्लॅग, JSW, युनिव्हर्सल प्रकल्प तसेच इतर विकास प्रकल्पांविरोधात तीव्र भूमिका घेत संबंधित कामे तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पत्रकांमध्ये ग्रामीण नागरिक, सरपंच आणि गावपाटील यांनी कंपन्यांच्या कामकाजाला विरोध करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कंपन्यांमुळे “जल, जंगल आणि जमीन” धोक्यात येत असून स्थानिक आदिवासी समाजाच्या अस्तित्वावर भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात, असा दावा करण्यात आला आहे. कंपन्यांना सहकार्य करणाऱ्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही या पत्रकांतून देण्यात आल्याचे समोर आले आहे.
याशिवाय ओम साईराम, सनफ्लॅग प्रकल्प, हेटळकसा-कुदरी-मोहुर्ली परिसरातील नॅचरल कंपनी, जेएसडब्ल्यू प्रकल्प, युनिव्हर्सल तसेच खेमरागडी-पिपली बुर्गी परिसरात प्रस्तावित ड्रोन सर्वेक्षणालाही विरोध दर्शविण्यात आला असून संबंधित सर्व कामे तात्काळ बंद करण्याची चेतावणी देण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत सुरक्षा दलांनी सातत्याने राबविलेल्या नक्षलविरोधी कारवायांमुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी कारवाया मोठ्या प्रमाणात कमकुवत झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र कुंडम गावाजवळ आढळून आलेले हे बॅनर आणि पत्रके नक्षलवादी हालचाली पुन्हा सक्रिय होत असल्याची शक्यता व्यक्त करत असल्याने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे.
पोलीसांनी घटनास्थळावरून बॅनर व पत्रके जप्त करून त्यांचा तपास सुरू केला आहे. परिसरातील जंगल भागात शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

