
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली,दि.१२ जूलै:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने सोमवार, १३ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता चंद्रपूर रोडवरील अभिनव लॉन येथे भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्ष संघटना अधिक सक्षम करणे, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दिशा निश्चित करणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या मेळाव्याला माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची आगामी संघटनात्मक वाटचाल, बूथस्तरावरील संघटन बळकटीकरण, जनसंपर्क वाढविणे तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
मेळाव्यात शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक-युवती, महिला, आदिवासी बांधव, भूमिहीन नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी उपलब्ध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते संघटनात्मक बांधणी, जनतेच्या समस्या, त्यावरील उपाययोजना आणि जिल्ह्याच्या विकासाचा रोडमॅप यावरही मार्गदर्शन करणार आहेत. हा मेळावा केवळ पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक रवींद्र वासेकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गडचिरोली असून त्यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
“संघटन मजबूत – जनतेचा विश्वास दृढ – विकासाचा नवा संकल्प!” या घोषवाक्यासह होणाऱ्या या मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

