
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची तालुक्यातील कोरची–सातपुती मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नसून वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे शाळा सुरू झाल्याने या मार्गावरून दररोज सायकलने ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनाही अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
हा मार्ग कोरची मुख्यालयाशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा असून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी वाहने, सायकलस्वार तसेच विद्यार्थी या रस्त्याचा वापर करतात. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. परिणामी वाहनांचे संतुलन बिघडून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल चालविताना मोठी कसरत करावी लागत असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

स्थानिक नागरिकांनी या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. परिणामी पावसाळ्यात नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सातपुती व परिसरातील गावांतील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि व्यापारी यांची या मार्गावर मोठी वर्दळ असते. त्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वीच संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
—
प्रतिक्रिया :
“रस्त्यावर इतके मोठे खड्डे पडले आहेत की पावसाचे पाणी साचल्यानंतर ते दिसतच नाहीत. शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांनाही सायकलने जाताना धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करावी.”
— रतनलाल घाटगुमर नागरिक, कोहका
“या मार्गाने दररोज प्रवास करावा लागतो. खड्डे चुकवताना अनेकदा वाहन घसरते. संबंधित विभागाला वारंवार कळवूनही दखल घेतली जात नाही. मोठा अपघात होण्यापूर्वी रस्ता दुरुस्त करणे अत्यावश्यक आहे.”
— अशोक गावतुरे माजी उपसरपंच बेलगाव घाट

