
महसूल मंत्र्यांच्या मंत्रालयीन ऑनलाईन बैठकीत प्रॉपर्टी कार्ड, वर्ग-2 ते वर्ग-1 रूपांतरणासाठी 7 दिवसांत जीआर काढण्याचे आदेश; बंगाली समाजाला मोठा दिलासा
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली समाजाच्या प्रलंबित जमीन व मालमत्ता विषयक प्रश्नांना मोठा दिलासा मिळाला असून, भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पत्रव्यवहार व पाठपुराव्याची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातून ऑनलाईन आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत बंगाली समाजाने रहीवाशी करिता ज्या जमिनी अतिक्रमीत केल्या आहेत त्या जमिनीचे मोफत प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच बंगाली बांधवांच्या शेतजमिनी वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी आवश्यक शासन निर्णय (जीआर) पुढील सात दिवसांत जारी करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले. यानुसार शेतमालकांना नियमानुसार 25 टक्के रक्कम भरल्यानंतर फेरफार करून जमिनी वर्ग-1 मध्ये मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीला भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, विभागीय आयुक्त विंद्री मॅडम, महसूल अधिकारी,
अप्पर महसूल सचिव, महसूल सचिव, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा, चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी, चामोर्शीचे तहसीलदार, मुलचेरा तहसीलदार तसेच संबंधित महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान बंगाली समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बिनाताई होळी यांना गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांनी बैठकीतील निर्णयांबाबत समाधान झाले का, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच बंगाली समाजाच्या उर्वरित प्रलंबित समस्याही लवकरात लवकर मार्गी लावाव्यात, अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.
या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जमीन विषयक प्रश्नांच्या निराकरणाचा मार्ग मोकळा झाला असून, माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना महत्त्वपूर्ण यश मिळाल्याची भावना बंगाली समाजातून व्यक्त करण्यात येत आहे.

