
चामोर्शी,दि.१० जुलै:
चामोर्शी तालुक्यातील सोनापूर येथील राजीव गांधी विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना शुक्रवारी अचानक भोवळ आल्याने एकच खळबळ उडाली. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले, तर उर्वरित तिघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, पाचही विद्यार्थी उपाशीपोटी शाळेत आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशक्तपणा व उपाशीपोटी असल्यामुळे त्यांना भोवळ आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेबाबत चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तारकेश्वर उईके यांनी पाचही विद्यार्थ्यांना भोवळ आल्याची पुष्टी केली. सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्यात आले असून दोघांना अधिक उपचारासाठी गडचिरोली येथे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राजीव गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक उईके यांना संपर्क केला असता त्यांनीही पाचही विद्यार्थी हे उपाशीपोटी शाळेत आल्याने भोवळ आली असल्याचे सांगितले
भोवळ आलेले विद्यार्थी :
कु. उर्वशी रामभाऊ वट्टी (वय 14, सगणापूर)
कु. सानिया संदीप येजलवार (वय 15, सोनापूर)
कु. गुणश्री प्रवीण नैताम (वय 16, जामगिरी)
कु. कीर्ती देविदास कोडापे (वय 16, सोनापूर)
प्रितम दीपक मेश्राम (वय 14, सोनापूर)
यापैकी कु. सानिया संदीप येजलवार व कु. गुणश्री प्रवीण नैताम यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले असून उर्वरित तिघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
या घटनेमुळे पालकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वैद्यकीय उपचारानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

