
चामोर्शी | प्रतिनिधी
चामोर्शी तालुक्यातील मौजा चित्तरंजनपूर येथील बाजार रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात जड वाहनांची ये-जा होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करत गावकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, चित्तरंजनपूर बाजार रोड हा गावातील प्रमुख मार्ग असून याच मार्गावरून नागरिक, विद्यार्थी तसेच शेतकरी नियमित ये-जा करतात. मात्र बाजार समितीमध्ये येणाऱ्या जड वाहनांमुळे रस्ता वारंवार अडवला जात असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा रस्ता पूर्णपणे बंद होत असल्याने अपघाताचा धोका वाढला असून लहान मुलांनाही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

यापूर्वीही बाजार समिती प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी विश्वजीत ठाकुर रप्तान, रितेश भूपेंद्र सरकार, जगदीश सुशील मंडल, राजेंद्र रामटेके, संजय नागपुरे, शुभम कुलू, मोहन बहादूर, कमल मंडल, दिनेश देवेंद्र मंडल आणि आशु देवनाथ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

