
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली,दि.९ जूलै:
खरीप हंगाम सुरू होताच गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या उपलब्धतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. युरिया व इतर खतांच्या खरेदीसाठी काही कृषी केंद्रांकडून शेतकऱ्यांना सूक्ष्म अन्नद्रव्ये, कीटकनाशके किंवा इतर कृषी उत्पादने सक्तीने खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या बेकायदेशीर ‘लिंकिंग’ प्रकारावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी राज्याचे कृषिमंत्री यांच्याकडे केली आहे.

ब्राह्मणवाडे यांनी दिलेल्या निवेदनात, खत विक्री करताना इतर उत्पादने सक्तीने विकण्याची प्रथा शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणाला कारणीभूत ठरत असल्याचे नमूद केले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना अनावश्यक खर्च सहन करावा लागत असून, खरीप हंगामात त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे.
यासोबतच खतांसाठी बेकायदेशीर ‘लिंकिंग’ करणाऱ्या संबंधित कंपन्या व पुरवठादारांवर कठोर कायदेशीर कारवाई करून दोषी कृषी केंद्रांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना युरिया व इतर रासायनिक खतांचा पुरेसा आणि सुरळीत पुरवठा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या सक्तीशिवाय आवश्यक खते उपलब्ध व्हावीत आणि त्यांच्या हिताचे संरक्षण व्हावे, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

