
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली, दि. ९ जुलै : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या येथील दानपेटी व देणग्यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत होत असलेल्या आरोपांची निष्पक्ष, पारदर्शक व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी केली. यासाठी गडचिरोली शहरातील श्रीराम मंदिर (फुटका देऊळ), कारगिल चौक येथे “रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन” करण्यात आले.
आंदोलनाची सुरुवात “रघुपती राघव राजाराम” या भजनाने करण्यात आली. त्यानंतर गडचिरोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपत राय, ट्रस्टी अनिल मिश्रा आणि कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी यांच्याविरुद्ध विविध माध्यमांतून समोर आलेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशीत कोणताही गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले की, देशभरातील लाखो रामभक्त श्रद्धेने मंदिरात देणग्या अर्पण करतात. त्यामुळे या निधीच्या व्यवस्थापनात संपूर्ण पारदर्शकता राहणे आवश्यक असून, जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी सक्षम यंत्रणांनी वस्तुनिष्ठ तपास करून सत्य जनतेसमोर आणावे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राम मेश्राम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज गुड्डेवार, गटनेते तथा नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेवक नंदू कायरकर, नगरसेवक पराग पोरेडीवार, उपाध्यक्ष निकेश गद्देवार, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, नंदू वाईलकर, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष माधवराव गावळ, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज ढोरे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विवेक घोंगडे यांच्यासह प्रभाकर वासेकर, हरबाजी मोरे, शंकरराव सालोटकर, जितू मुनघाटे, सोनू आलम, मिलिंद खोब्रागडे, भोयर ताई, शितल ठवरे, कविता उराडे, रिता गोवर्धन, प्रा. अर्चना राजेश चन्नावार, मीनल चिमूरकर, सरपंच संजय गावडे तसेच काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

