
अमित कत्तीवार, विशेष जिल्हा प्रतिनिधी
- एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील जारावंडी व सेवारी ग्रामपंचायतीतील विविध गंभीर प्रशासकीय व आर्थिक प्रश्नांवर अखेर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन्ही ग्रामपंचायतीतील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती एटापल्ली यांना अंतिम स्मरणपत्र देत दि. १४ जुलैपासून पंचायत समिती कार्यालयासमोर संयुक्त बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची पूर्वसूचना दिली आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी, निवेदने व स्मरणपत्रे देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात सेवारी ग्रामपंचायतीतील मागील तीन वर्षांतील संपूर्ण शासकीय निधी, विकासकामे व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सेवारी ग्रामपंचायतीला नियमित व पूर्णवेळ ग्रामसेवक उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. अतिरिक्त कार्यभारामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज विस्कळीत झाले असून नागरिकांची अनेक कामे प्रलंबित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
त्याचप्रमाणे जारावंडी ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक मनोज गेडाम यांच्या कार्यकाळात झालेल्या संपूर्ण आर्थिक व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जारावंडी ग्रामपंचायतीलाही तात्काळ नियमित व पूर्णवेळ ग्रामसेवक नियुक्त करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे, ग्रामस्थांची दैनंदिन प्रशासकीय कामे व रखडलेली विकासकामे तातडीने मार्गी लावावीत, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांच्या बायोमेट्रिक उपस्थिती व मुख्यालयी वास्तव्यासंदर्भात यापूर्वी सादर केलेल्या निवेदनांवर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, सुलभा राजू गोमाडी,
रीना रानु गावडे, पल्लवी गावतुरे, पुष्पां साईनाथ चाटारे, मुकुल गुरनुले ग्राम पंचायत सदस्य सेवारी आणि मुकेश वामन कावळे, ग्राम पंचायत सदस्य जारावंडी
आणि समस्त ग्रामस्थ, ग्रामपंचायत जारावंडी
आणि ग्रामस्थ ग्रामपंचायत सेवारीयांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला असून, १४ जुलै २०२६ पासून पंचायत समिती कार्यालय, एटापल्ली समोर संयुक्त बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मागण्यांवर लेखी स्वरूपात ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला असून, आता या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
वारंवार निवेदने, तरीही कारवाई शून्य; अखेर उपोषणाचा निर्णय
जारावंडी व सेवारी ग्रामपंचायतीतील विविध प्रशासकीय व आर्थिक अनियमिततांबाबत ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे मागील काही महिन्यांत वारंवार निवेदने, तक्रारी व स्मरणपत्रे सादर केली. मात्र, या तक्रारींची गंभीर दखल घेऊन कोणतीही ठोस प्रशासकीय कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, न्याय मिळविण्यासाठी आणि प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखेर दि. १४ जुलैपासून पंचायत समिती, एटापल्ली कार्यालयासमोर संयुक्त बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाला अंतिम इशारा
दरम्यान, ग्रामस्थांनी प्रशासनाला अंतिम इशारा देत स्पष्ट केले आहे की, दि. १४ जुलै २०२६ पासून पंचायत समिती, एटापल्ली कार्यालयासमोर संयुक्त बेमुदत उपोषणास प्रारंभ करण्यात येणार आहे. जोपर्यंत सेवारी व जारावंडी ग्रामपंचायतींसंदर्भातील मागण्यांवर लेखी स्वरूपात ठोस निर्णय घेऊन आवश्यक प्रशासकीय कारवाई सुरू होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करूनही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशाराही देण्यात आला असून, आता प्रशासन या इशाऱ्याची कितपत गांभीर्याने दखल घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

