
जिल्हा प्रतिनिधी |गडचिरोली
चामोर्शी, दि. ९ जूलै: चामोर्शी तालुक्यात सध्या केवळ एकच स्टॅम्प वेंडर कार्यरत असल्याने नागरिकांना विविध शासकीय व कायदेशीर कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढती लोकसंख्या, शासकीय कागदपत्रांची वाढलेली गरज आणि दैनंदिन व्यवहार लक्षात घेता तालुक्यात तातडीने आणखी स्टॅम्प वेंडरची नियुक्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मालमत्ता खरेदी-विक्री, प्रतिज्ञापत्र, करारनामा, शपथपत्र तसेच इतर विविध कागदपत्रांसाठी स्टॅम्पची आवश्यकता असते. मात्र एकच स्टॅम्प वेंडर असल्यामुळे नागरिकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. अनेकदा गर्दीमुळे कामे खोळंबतात आणि वेळेवर कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने शासकीय कार्यालयांतील कामकाजावरही परिणाम होत आहे.

विशेषतः दुर्गम भागातून येणाऱ्या नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याने वेळ आणि आर्थिक खर्च वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, वकील, दस्त नोंदणीशी संबंधित व्यक्ती तसेच विविध कार्यालयांतील कामकाज करणाऱ्यांनी तालुक्यात किमान आणखी एक किंवा दोन स्टॅम्प वेंडरची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी आणि शासकीय कामकाज अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने संबंधित प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन चामोर्शी तालुक्यात अतिरिक्त स्टॅम्प वेंडरची नियुक्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सतिश चिचघरे यांनी केले आहे

