Students face difficulties due to a shortage of classrooms.

श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली

कोरची : कोरची पंचायत समितीअंतर्गत बेळगाव केंद्रातील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दंवडी येथे अपुऱ्या वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे ३१ विद्यार्थी असून, त्यांच्यासाठी केवळ दोन वर्गखोल्या आणि दोन शिक्षक उपलब्ध आहेत. त्यामुळे पाचही वर्गांचे अध्यापन दोन खोल्यांत करणे शक्य होत नसल्याने दोन वर्ग झाडाखाली बसवून शिकविण्याची वेळ आली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. वर्गखोल्यांअभावी विद्यार्थ्यांना एका ठिकाणी बसवून अध्यापन करताना शिक्षकांनाही अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे, शाळेच्या या समस्येबाबत ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीकडे आणि वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्यावर ठोस कार्यवाही झालेली नसल्याची माहिती मुख्याध्यापिका रेषमा कंगाले यांनी दिली.

कोरची शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दंवडी येथील शाळेत विद्यार्थ्यांना वर्गखोलीऐवजी झाडाखाली बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याने शिक्षण व्यवस्थेतील सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. Students face difficulties due to a shortage of classrooms.
३१ विद्यार्थी, ५ वर्ग आणि केवळ २ खोल्या , शाळेतील आवश्यक सुविधा उपलब्ध न झाल्यास पालकांचा सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवरही होऊ शकतो. त्यामुळे दंवडी शाळेसाठी तातडीने अतिरिक्त वर्गखोल्यांचे बांधकाम मंजूर करून विद्यार्थ्यांना सुरक्षित व योग्य शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत ग्रामवासीयांकडून होत आहे.

