
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने तालुका अध्यक्ष क्रांती केरामी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार, कोरची यांच्या मार्फत निवेदन सादर करून शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी तात्काळ रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरण्याऐवजी जाचक अटींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, या अटी तातडीने रद्द करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

सध्या शेतकरी सततची नापिकी, अवकाळी पाऊस, नैसर्गिक संकटे आणि शेतीमालाला मिळणारा कमी भाव यामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा बिकट परिस्थितीत शासनाने लादलेल्या अटी या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारख्या असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच, 2019 च्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवरील 50 हजार रुपयांची कर्ज मर्यादा पूर्णतः रद्द करावी, तसेच कोणत्याही जाचक अटी न लावता सर्व शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देताना लावलेल्या अटीदेखील शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, 2017 च्या कर्जमाफी योजनेतील तांत्रिक कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने न्याय देऊन त्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घेऊन त्यांच्या खात्यात थेट मदतीची रक्कम जमा करण्यात यावी, अशीही विनंती करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी नंदूभाऊ नरोटे कार्याध्यक्ष रा. का पा. गडचिरोली, सिद्धार्थ उंदीरवाडे, अध्यक्ष ए. सी. सेल तालुका अध्यक्ष रा. का. कोरची, डाँ. माणिक गहाने महासचिव रा. का. पा. कोरची,मायाराम कोल्हे, आदि उपस्थित होते

