
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची तालुक्यातील मसेली ग्रामपंचायत मधील राजाटोला येथील नविन वसाहतीतील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष क्रांती केरामी यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, राजाटोला येथील नविन वसाहतीत मागील १२ ते १४ वर्षांपासून काही कुटुंबे वास्तव्यास असून, सुमारे २५ लोकसंख्या येथे राहते. मात्र आजपर्यंत या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी ५ ते ६ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. तसेच वीजेसारखी अत्यावश्यक सुविधा देखील उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या परिस्थितीमुळे संबंधित नागरिक विकासापासून वंचित राहिले असून, प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून पाणी व वीज सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या सुविधा मिळाल्यास नागरिक मुख्य प्रवाहात येऊन त्यांचा विकास साधता येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तहसील प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

