
नितेश गट्टीवार गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर
गडचिरोली,दि.१६ जून : उच्च प्रतीच्या सागवान वृक्षांसाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या आलापल्ली येथील ‘ग्लोरी ऑफ आलापल्ली’ या वनव्याप्त क्षेत्राला राज्य शासनाकडून ‘क’ गट निसर्ग रम्य स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिली.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी १२ वर्षांच्या कारकिर्दीतील विकास, विश्वास आणि जनकल्याणकारी योजनांची माहिती भामरागड तालुक्यातील नागरिकांना देण्यासाठी आयोजित बैठकीनंतर परत येत असताना माजी आमदार डॉ. होळी यांनी आलापल्ली येथील वनविभागाच्या विभागीय कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी ‘ग्लोरी ऑफ आलापल्ली’ परिसराची माहिती घेत वनसंपदेचा आढावा घेतला.

यावेळी बोलताना माजी आमदार डॉ. होळी म्हणाले की, आलापल्ली परिसरातील शेकडो वर्षे जुनी सागवान झाडे, समृद्ध जैवविविधता आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे ‘ग्लोरी ऑफ आलापल्ली’ हे विदर्भातील एक महत्त्वाचे पर्यटन व पर्यावरणीय वारसा स्थळ आहे. या ठिकाणाला ‘क’ गट निसर्ग रम्य स्थळाचा दर्जा प्राप्त झाल्यास पर्यटनाला चालना मिळेल, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसेच वनसंवर्धनालाही बळ मिळेल.
गडचिरोली जिल्ह्याच्या नैसर्गिक संपदेचा राज्य व देशपातळीवर प्रचार-प्रसार होण्यासाठी आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या परिसराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सुविधांबाबतही त्यांनी माहिती घेतली.
या भेटीदरम्यान वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. माजी आमदार डॉ. होळी यांच्या या पुढाकारामुळे ‘ग्लोरी ऑफ आलापल्ली’ या ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा लाभलेल्या स्थळाच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

