
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली/चामोर्शी :
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडा देवस्थानासाठी बंद असलेली बस सेवा तात्काळ सुरू करावी, चामोर्शी येथे NCMC स्मार्ट कार्ड सेंटर सुरू करावे तसेच अधिकृत बस थांब्यांवरच बसेस थांबवून वेळापत्रक नियमित करावे, अशी मागणी एनएसयुआय जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन आगार व्यवस्थापक सचिन गावाडे यांना सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कोविडपूर्व काळात मूल–भेंडाळा–मार्कंडा मार्गावर सकाळी ११ वाजता व सायंकाळी ५ वाजता नियमित बस सेवा उपलब्ध होती. मात्र कोविडनंतर ही सेवा बंद करण्यात आली असून आजपर्यंत ती पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे हजारो भाविक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

चामोर्शीसारख्या मोठ्या तालुक्यात अद्याप NCMC स्मार्ट कार्ड सेंटर नसल्याने प्रवाशांना कार्ड काढण्यासाठी व रिचार्जसाठी इतर ठिकाणी जावे लागत असून प्रशासनाने ही गैरसोय तात्काळ दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय अनेक ठिकाणी अधिकृत बस थांबे असतानाही बसेस तेथे न थांबता पुढे जाऊन थांबत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना धावपळ करावी लागत असून अपघाताचा धोका वाढत आहे. त्यामुळे सर्व चालक व वाहकांना अधिकृत बस थांब्यांवरच बसेस थांबविण्याच्या सक्त सूचना देण्यात याव्यात. तसेच बसेस वेळेवर धावतील यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
सदर मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय न झाल्यास भाविक, विद्यार्थी व नागरिकांच्या वतीने तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल. तसेच “खुर्ची छोडो, आराम करो” आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी प्रीतम पांढरे, जावेद खान, सूरज रोहनकर, प्रीतम फुलझेले यांच्यासह एनएसयुआय चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

