
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली ,दि.९ जुन:
गडचिरोली शहरातील आयटीआय बायपास रोड, गोकुळनगर परिसरातील हॉस्पिटलजवळ दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. रुग्ण, नागरिक तसेच परिसरातील रहिवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन, संबंधित ठिकाणी नाली खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, या कामामुळे पावसाचे पाणी जलदगतीने वाहून जाण्यास मदत होणार आहे.
विशेषतः मुसळधार पावसाच्या काळात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने वाहतूक विस्कळीत होणे, हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना अडचणी निर्माण होणे तसेच परिसरात अस्वच्छतेचे वातावरण तयार होण्याची समस्या सातत्याने समोर येत होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर तातडीने उपाययोजना करत नालीचे खोलीकरण व पाण्याचा नैसर्गिक निचरा सुरळीत करण्यासाठी काम सुरू करण्यात आले.

या कामाची पाहणी करताना स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाकडे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली. शहरातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी अशा प्रकारची कामे वेळेत आणि प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमात नगराध्यक्ष अँड. प्रणोती सागर निंबोरकर, नगर परिषद उपाध्यक्ष निखिल चरडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी नगर सेविका साक्षी बोलुवार, घनश्याम वाढई, शिवराम पुल्लुरी, बृजोष मंडल, आकाश बोलुवार आणि नागया दासरवार उपस्थित होते.
स्थानिकांच्या मते, नाली खोलीकरणामुळे यंदाच्या पावसाळ्यात परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येत मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा असून नागरिकांनी या कामाचे स्वागत केले आहे.
“शहरातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधा उपलब्ध करून देणे हेच विकासाचे खरे उद्दिष्ट असून अशा समस्यांवर तातडीने उपाययोजना करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला.

