
अरुण बारसागडे , उपसंपादक, न्यूज जागर चंद्रपूर
गरिबांच्या धान्यावर डल्ला मारला जात असल्याचा नागरिकांचा आरोप
शासनाने ‘ वन नेशन वन रेशन कार्ड व ई – पॉस मशीनद्वारे धान्य वाटप बंधनकारक केले असतानाही जिवती तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून एकूण ९१ स्वस्त धान्य दुकानापैकी तब्बल ४५ दुकाने आजही डिजिटल इंडिया च्या काळात गावात नेटवर्क नाही म्हणून ऑफलाइन पद्धतीने सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे, यामुळे गरिबांच्या धान्यावर डल्ला मारला जात असल्याचे आरोप नागरिकाकडून करण्यात येत आहेत. यामुळे लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून गैरव्यवहाराला वाव मिळत आहे.

मागील अनेक वर्षापासून काही रेशिंग दुकानदाराकडून धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी होत आहेत या गैर प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने अनेक दुकाने ऑनलाईन प्रणालीशी जोडली होती. या प्रणालीमुळे वितरणात पारदर्शकता येण्याची अपेक्षा होती मात्र अद्यापही काही दुकाने ऑफलाइनच सुरू असल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.
ऑफलाइन व्यवहारामुळे धान्य वितरणावर नियंत्रण राहत नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप स्थानिकाकडून करण्यात येत आहे कार्ड धारकांच्या म्हणण्यानुसार,”आमच्या हक्काचे धान्य पूर्ण मिळत नाही, मात्र नोंदीत सर्व काही दिल्याचे दाखवले जाते.”त्यामुळे गरिबांच्या तोंडचा घास हिरावला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
दरम्यान, काही ठिकाणी दुकानदाराकडून अल्प प्रमाणात धान्य देऊन उर्वरित साठा काळया बाजारात वळवला जात असल्याचाही आरोप आहे.“गरिबांचे धान्य खाऊन दुकानदार मालामाल होत आहेत,”अशी तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

