
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
24 मे रोजी दिघी मोहल्ले येथील बोरकर कुटुंबाचे हाल, सायंकाळी 6:30 चे लग्न रात्री 9:30 ला; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही NHAI ची केराची टोपली
कोरची, प्रतिनिधी: कुरखेडा-कोरची-बोटेकसा-छत्तीसगड या राष्ट्रीय महामार्गावरील बेळगाव घाटात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI च्या दुर्लक्षामुळे महिन्यातून दोन-तीन वेळा भीषण वाहतूक कोंडी होत आहे. डांबरीकरणाच्या बाजूला मोठमोठे खड्डे पडल्याने एक ट्रक बिघडला की संपूर्ण रस्ता बंद पडतो.

24 मे: लग्नाची वऱ्हाड 5 तास जाममध्ये
24 मे 2026 रोजी बेळगाव घाटात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील दिघी मोहल्ले येथील बोरकर कुटुंब कोरची येथे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योती भैसारे यांच्या मुलीच्या लग्नाला येताना 5 तास अडकून पडले. वऱ्हाडात लहान मुले व वृद्ध नागरिक असल्याने त्यांना उन्हात कमालीचा त्रास सहन करावा लागला. परिणामी, सायंकाळी 6:30 वाजता होणारा विवाह सोहळा रात्री 9:30 वाजता उरकावा लागला. वर-वधू दोन्ही पक्षांना वाहतुकीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.


ॲम्बुलन्सला वळसा, रुग्णांचे हाल
बेळगाव घाट बंद पडल्याने कोरची ग्रामीण रुग्णालयातून जाणाऱ्या रुग्णवाहिकांना चिचगड-नवेगाव बांध मार्गे 40 किमीचा वळसा घालावा लागतो. गंभीर रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्यास जीवितहानी होऊ शकते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही नकार
गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी NHAI ला पत्र देऊन बेळगाव घाटातील खड्डे व साईड बर्म तात्काळ भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, NHAI ने या पत्राला केराची टोपली दाखवल्याने आजही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
ओव्हरलोड ट्रक व टोल चुकवणारी वाहतूक कारणीभूत
नागपूर-देवरी-रायपूर मार्गावरील टोल वाचवण्यासाठी राजनांदगाव येथून बोटेकसा-कोरची-कुरखेडा मार्गे अवजड वाहतूक वाढली आहे. सुरजागड लोह प्रकल्पातील खनिज वाहतूक करणारे ओव्हरलोड ट्रक याच मार्गाने धावत असल्याने रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे. यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालवणे जीवघेणे झाले आहे.

