
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी , गडचिरोली
कोरोना काळापासून ब्रह्मपुरी-गोंदिया बस बंद, उत्पन्नाअभावी डिझेल वाया; कुरखेडा-देवरी मार्गे गोंदिया बस सुरू केल्यास एसटीला फायदा होईल
ब्रह्मपुरी आगार व्यवस्थापकाने तोट्यात चालणारी कोरची-ब्रह्मपुरी बस सेवा तात्काळ बंद करून, कोरोना काळापासून बंद असलेली ब्रह्मपुरी-कोरची-गोंदिया ही बस सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.

सध्या ब्रह्मपुरी-कोरची या वेळेवर नागपूर आगाराची नागपूर-ब्रह्मपुरी-कोरची ही बस नियमित सुरू आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी आगाराच्या बसला प्रवासी मिळत नाहीत. परिणामी, ही बस रिकामी धावत असल्याने डिझेलचा खर्च नाहक वाया जातो व आगाराला मोठा तोटा सहन करावा लागतो.
प्रवाशांचे म्हणणे आहे की, ब्रह्मपुरी-कोरची ही बस बंद करून त्याऐवजी भरपूर उत्पन्न देणारी ब्रह्मपुरी-कुरखेडा-कोरची-देवरी-गोंदिया ही बस सेवा सुरू करावी. कोरोना काळापूर्वी ही बस सेवा सुरू होती व तिला मोठा प्रतिसाद मिळत होता. कुरखेडा, देवरी, गोंदिया येथे जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार व व्यापाऱ्यांसाठी ही बस अत्यंत सोयीची होती.
प्रवाशांनी सुचवलेले वेळापत्रक असे आहे: ब्रह्मपुरी येथून सकाळी 7 वाजता बस सुटावी व गोंदिया येथून दुपारी 3 वाजता परतीचा प्रवास सुरू करावा. या वेळेत शाळा, कॉलेज व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची मोठी सोय होईल. तसेच, कुरखेडा व देवरी तालुक्याला थेट गोंदिया व ब्रह्मपुरीशी जोडले गेल्याने एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही भर पडेल.
“सध्या गोंदियाला जायचे असेल तर खाजगी जीपने किंवा बदलत जावे लागते. वेळ व पैसा दोन्ही वाया जातो. एसटीने थेट सेवा दिली तर प्रवाशांचा त्रास वाचेल व महामंडळालाही फायदा होईल,” अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
याबाबत ब्रह्मपुरी आगार व्यवस्थापकांनी तात्काळ निर्णय घेऊन प्रवाशांची मागणी पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे

