Korchi gadchiroli

श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
नाना पटोलेंच्या तक्रारीनंतर मंत्रालय अॅक्शन मोडमध्ये, 20 मे रोजी EOW ला पत्र; कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा संशय
कोरची, प्रतिनिधी: किमान आधारभूत किंमत योजनेत धान खरेदीच्या नावाखाली गडचिरोलीत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. आमदार नाना पटोले यांच्या तक्रारीनंतर मंत्रालयाने तत्परता दाखवत आर्थिक गुन्हे शाखा EOW ला चौकशीचे आदेश दिले आहेत. मे. मायाश्री राईस इंडस्ट्रीज, मे. मायाश्री पॅरा बॉयलींग, मे. मायाश्री राईस मिल, मे. आकाश ट्रेडर्स व मे. श्री किसन ट्रेडर्स या 5 कंपन्यांवर FIR दाखल करण्याचे निर्देश 20 मे रोजी दिले आहेत.

अवर सचिव विकास राऊत यांनी पोलीस महासंचालक, EOW पुणे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, “सदर प्रकरणी सकृतदर्शनी दोषी आढळल्यास प्रथम फिर्याद दाखल करून नियमानुसार कारवाई करावी.” नाना पटोले यांनी 9 मे रोजी शेतकऱ्यांच्या नावाने बोगस खरेदी करून शासनाची फसवणूक होत असल्याची तक्रार केली होती.
विधानसभेतून EOW पर्यंत पाठपुरावा
यापूर्वी आमदार नाना पटोले यांनी विधिमंडळात लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर शासनाने चार सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. आता हे प्रकरण थेट आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे गेल्याने मायाश्री ग्रुपचे सर्वेसर्वा आकाश अग्रवाल यांची चोहोबाजूंनी कोंडी झाली आहे. चौकशी समिती आणि EOW च्या कचाट्यात सापडल्याने त्यांची सळो की पळो अशी दयनीय अवस्था झाली आहे.
आता EOW चे पथक या कंपन्यांचे खरेदी-विक्री रेकॉर्ड, बँक व्यवहार व वाहतूक परवाने तपासणार आहे. बोगस खरेदी सिद्ध झाल्यास मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

