
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
तालुक्यात एकमेव भारत पेट्रोलियम पंप, संचालक देतो फक्त 500 रुपयांचे डिझेल; उन्हाळी धान कापणी व पेरणीपूर्व मशागतीवर संकट, केंद्राने लक्ष द्यावे अशी मागणी
अति दुर्गम व नक्षलग्रस्त कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांवर डिझेल तुटवड्याचे संकट कोसळले आहे. तालुक्याच्या ठिकाणी भारत पेट्रोलियम कंपनीचा एकमेव पेट्रोल पंप असून गेल्या काही दिवसांपासून तेथे डिझेल मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे उन्हाळी धान कापणी व खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीची कामे ठप्प झाली आहेत.

सध्या उन्हाळी धान कापणीचा हंगाम सुरू आहे. त्याचवेळी खरीपासाठी शेतीची नांगरट, रोटावेटर मारणे ही कामे सुरू आहेत. या सर्व कामांसाठी ट्रॅक्टर व पॉवर टिलरला डिझेलची नितांत गरज आहे. मात्र, कोरचीतील एकमेव पेट्रोल पंपावर गेल्यावर संचालक फक्त 100 रुपयांचे पेट्रोल व 500 रुपयांचे डिझेल देत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
“500 रुपयांच्या डिझेलमध्ये ट्रॅक्टरचे स्टार्ट पण धड होत नाही. नांगरट करायची कशी? हंगाम वाया गेला तर कुटुंब कसे जगवायचे?” असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपांवर तेल कंपन्यांकडून डिझेल-पेट्रोलचा मुबलक पुरवठा केला जातो. मात्र, कोरचीसारख्या ग्रामीण व दुर्गम भागातील पंपांना जाणीवपूर्वक पुरवठा बंद केला जातो. त्यामुळे येथील नागरिक व शेतकऱ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत.
कोरची तालुक्यात एकच पंप असल्याने शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नाही. 50-60 किमी लांब जाऊन डिझेल आणणे परवडत नाही. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य शासनाने तात्काळ यात लक्ष घालून भारत पेट्रोलियम कंपनीला कोरची पंपावर मुबलक डिझेल पुरवठा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
“शेतकरी जगला तर देश जगेल. हंगामाच्या तोंडावर डिझेल नाही मिळाले तर या वर्षी शेती करणे अशक्य होईल,” अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

