
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
मोहगाव टी-पॉइंट ते पंकनाभट्टीपर्यंत महामार्ग खोदला, अंडरग्राउंड लाईन टाकली; तांत्रिक मंजुरी देताना जिल्हाधिकारी कार्यालयाने कोणते निकष तपासले ??
5500 लोकसंख्येच्या कोरची नगरपंचायतीने 11 वर्षांत पथदिव्यांवर 4 कोटी रुपये खर्च करूनही शहर अंधारात आहे. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे 2 कोटी रुपयांचे पथदिवे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची परवानगी न घेताच राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आले आणि ते गेल्या 7 वर्षांपासून बंद आहेत. कुरखेडा-कोरची-बोटेकसा-छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गावर मोहगाव पासून आश्रम शाळा टी-पॉइंट पर्यंत आणि कुरखेडा-कोरची-देवरी राष्ट्रीय महामार्गावर पंकनाभट्टी समोर पर्यंत हे 2 कोटीचे पथदिवे लावले आहेत. यासाठी नगरपंचायतीने रस्त्याच्या कडेला पोल उभे करून अंडरग्राउंड विद्युत लाईन टाकली.

नियमानुसार राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत कोणतेही बांधकाम किंवा विद्युत लाईन टाकण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI ची पूर्वपरवानगी बंधनकारक आहे. मात्र कोरची नगरपंचायतीने ही परवानगी घेतली नसल्याचे बोलले जात आहे. 2 कोटीचे पथदिवे लावताना NHAI ची मंजुरी घेतलीच नाही.
इतक्या मोठ्या कामाला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देताना जिल्हाधिकारी कार्यालयाने कोणते निकष तपासले, NHAI ची परवानगी आहे का हे पाहिले का, असा सवाल उपस्थित होत आहे. परवानगीशिवाय महामार्ग खोदून अंडरग्राउंड केबल टाकणे हा गंभीर नियमभंग आहे.
2018-19 मध्ये बसवलेले हे 2 कोटीचे LED पथदिवे व हायमास्ट 6 महिन्यांतच बंद पडले. गेल्या 7 वर्षांपासून ते धूळ खात पडले आहेत. तरीही दरवर्षी दुरुस्तीच्या नावाने बिले निघत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
या संदर्भात कनिष्ठ अभियंता मंगेश नाकाडे यांना NHAI परवानगीबाबत विचारले असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. NHAI च्या गडचिरोली कार्यालयाकडे विचारणा केली असता “कोरची नगरपंचायतीने पथदिव्यांसाठी कोणतीही परवानगी मागितलेली नाही,” अशी माहिती मिळाली आहे

