
श्री. नंदकिशोर वैरागडे , विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
भाजपा युवा मोर्चाच्या मागणीनंतर मुख्य कार्यकारी अभियंता पारेख यांचे आदेश; गोटाटोला, पाटीलटोलासह इतर गावांना दिलासा
तालुका मुख्यालयापासून 30 ते 40 किमी अंतरावरील कोटगुल परिसरातील गावांमध्ये पावसाळ्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी थ्री-फेज केबल वायरद्वारे विद्युत जोडणी करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले आहे. भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, पुढील 15 दिवसांत गोटाटोला, पाटीलटोला व परिसरातील गावांमध्ये काम पूर्ण केले जाणार आहे.
ढोलडोंगरी येथे 33 केव्ही विद्युत सब सेंटर सुरू झाल्यानंतर अनेक गावांतील वीज समस्या कमी झाली. मात्र कोटगुल परिसरातील काही गावांमध्ये अद्यापही कमी दाबाने वीजपुरवठा व वारंवार खंडित होण्याची समस्या कायम होती.
ही समस्या सोडवण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी यांनी ई-मेल व भ्रमणध्वनीद्वारे तक्रार नोंदवून, प्रत्येक गावात केबल वायरने थ्री-फेज जोडणी करावी जेणेकरून कमी दाबाची समस्या उद्भवणार नाही, अशी मागणी केली. याबाबत मुख्य कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., गडचिरोली पारेख साहेब यांच्याकडे निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.

चर्चेतील प्रमुख मुद्दे
1. 33 केव्ही सब सेंटरच्या देखरेखीसाठी कनिष्ठ अभियंत्याची नियुक्ती करावी.
2. पावसाळ्यात वारंवार ब्रेक डाऊन होत असल्याने ट्री कटिंग करावे.
3. कोरची व धानोरा तालुक्यातून नियमितपणे वीजपुरवठा सुरू ठेवावा.
चर्चेअंती मुख्य कार्यकारी अभियंता पारेख साहेबांनी मुरूमगाव येथील अभियंत्यांना समस्या तातडीने सोडवण्याचे आदेश दिले. संबंधित अभियंत्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता, “गोटाटोला, पाटीलटोला व परिसरातील गावांमध्ये 15 दिवसांत केबल वायरने थ्री-फेज विद्युत जोडणी पूर्ण केली जाईल,” असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी, प्रेमलाल उसेंडी, ईश्वर कोरेटी, नारद फुलारे, चिंताराम सोनफूल, अविनाश हारामी, रामलाल मुलेटी यांच्यासह क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

