
३५ जंगली हत्तींच्या कळपाचा बंदोबस्त करा; निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/देसाईगंज : देसाईगंज तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून जंगली हत्तींच्या कळपाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून शेतकरी, नागरिक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींकडून उभ्या पिकांची नासधूस, शेतघरे व कृषी साहित्याचे नुकसान तसेच मंदिराची तोडफोड होत असतानाही वन विभागाकडून अपेक्षित प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

या पार्श्वभूमीवर वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. वरूण एम. यांच्या कार्यपद्धतीची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करावी, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. हत्ती नियंत्रणासाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या उपाययोजना, खर्च झालेला निधी, उपलब्ध मनुष्यबळ व साधनसामग्री, शेतकऱ्यांच्या तक्रारी, नुकसान पंचनामे आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया यांचा सखोल आढावा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
“शेतकऱ्यांच्या जीविताचा प्रश्न असताना वन विभाग नेमके करतेय काय?”
देसाईगंज तालुक्यात सुमारे ३५ जंगली हत्तींच्या कळपाचा वावर असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने वन विभागाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला आहे. हत्ती वारंवार शेतांमध्ये घुसत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून पिकांचे संरक्षण करावे लागत आहे. त्यामुळे केवळ कागदी उपाययोजना न करता वन विभागाने प्रत्यक्ष मैदानात उतरून ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
नुकसान पंचनाम्यांमध्ये पारदर्शकतेची मागणी
हत्तींच्या हल्ल्यामुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळत नसल्याच्या तक्रारी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून त्रिसदस्यीय समितीमार्फत पारदर्शक पंचनामे करण्यात यावेत, तसेच नुकसानभरपाईच्या प्रक्रियेत विलंब किंवा निष्काळजीपणा करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली.
नुकसानभरपाईच्या प्रक्रियेत हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांचीही चौकशी करून दोषी आढळल्यास निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
३५ हत्तींच्या कळपाचा तातडीने बंदोबस्त करा
हत्तींच्या कळपाचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांच्या जीविताचे आणि शेतकऱ्यांच्या शेतीचे संरक्षण करावे. टस्कर हत्ती व त्याच्या कळपाबाबत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. आवश्यक असल्यास हत्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली.
तसेच जंगलालगतच्या शेतकऱ्यांना मोफत झटका मशीन, नुकसानग्रस्त शेतांचे त्रिसदस्यीय समितीमार्फत पंचनामे आणि शेतकऱ्यांना वाढीव नुकसानभरपाई देण्याची मागणीही करण्यात आली.
मुख्यमंत्री व वनमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा
या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस आणि वनमंत्री मा. ना. गणेश नाईक यांनी तातडीने हस्तक्षेप करून वडसा वन विभागाच्या कामकाजाचा आढावा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
“हत्तींच्या दहशतीमुळे शेतकरी रात्रभर जागून आपल्या पिकांचे संरक्षण करत आहेत. शेतकऱ्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झालेला असताना प्रशासनाने केवळ कागदी कारवाई न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून ठोस निर्णय घ्यावा. वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे परिस्थिती आणखी गंभीर होत असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे,” असा आक्रमक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
हत्तींचा तातडीने बंदोबस्त, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव नुकसानभरपाई आणि वडसा वन विभागाच्या कार्यपद्धतीची निष्पक्ष चौकशी करण्यात आली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.
शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांचा सहभाग
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्याध्यक्ष नंदू नरोटे आणि तालुका अध्यक्ष तथा सभापती पिंकू बावणे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम, सिनेट सदस्या तथा युवती जिल्हाध्यक्षा; नानाभाऊ नाकाडे, प्रदेश उपाध्यक्ष; युनूसभाई शेख, प्रदेश सरचिटणीस; जेसाभाऊ मोटवानी, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, जिल्हा उपाध्यक्ष संजय शाळवे, जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंगाडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष लतीफभाई शेख, जिल्हा संघटक सचिव किशोरभाऊ तलमले, विधानसभा अध्यक्ष हरीश मोटवानी, शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, आरमोरी कार्याध्यक्ष शुभांगी गराडे, महिला तालुका अध्यक्ष आरमोरी पल्लवी रामटेके, युवती तालुका अध्यक्ष आरमोरी सुरेखा गोंडोळे, जिल्हा उपप्रमुख रियाजूल शब्बीर, जिल्हाध्यक्ष कला व सांस्कृतिक विभाग गडचिरोली यांच्यासह वडसा वन विभागातील हत्तींच्या उपद्रवामुळे बाधित झालेले शेकडो शेतकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

