
श्री. नंदकिशोर वैरागडे , विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरोना काळापासून बंद असलेली गडचिरोली-धानोरा-मुरुमगाव-कोटगुल बससेवा पूर्ववत करण्यासाठी विनोद कोरेटी यांचा पुढाकार
कोरोना महामारीच्या काळापासून बंद पडलेली गडचिरोली-कोटगुल ही महत्त्वाची बससेवा पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सामाजिक कार्यकर्ते विनोद कोरेटी यांनी सहकाऱ्यांसह गडचिरोली बस आगार गाठून व्यवस्थापकांशी सविस्तर चर्चा केली व नियमित बससेवा सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.

4 वर्षांपासून सेवा बंद, नागरिकांचे हाल
गडचिरोली ते कोटगुल ही बस धानोरा, मुरुमगाव मार्गे धावत होती. हीच एकमेव सार्वजनिक वाहतुकीची सुविधा असल्याने विद्यार्थी, रुग्ण, नोकरदार व शेतकऱ्यांसाठी ती जीवनवाहिनी ठरत होती. मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे ही सेवा बंद करण्यात आली, ती आजपर्यंत सुरू झालेली नाही. परिणामी, या पट्ट्यातील नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून, आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
निवेदनात काय म्हटले?
विनोद कोरेटी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “गडचिरोली-धानोरा-मुरुमगाव-कोटगुल मार्गावरील बससेवा तत्काळ पूर्ववत करावी. ही बससेवा सुरू झाल्यास तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत दळणवळण सुलभ होईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल व गोरगरीब जनतेला दिलासा मिळेल.”
व्यवस्थापकांकडून सकारात्मक प्रतिसाद
यावेळी बस आगार व्यवस्थापकांशी झालेल्या चर्चेत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. “प्रवासी संख्या व मार्गाची पाहणी करून वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल. लवकरच नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू,” असे आश्वासन व्यवस्थापकांनी शिष्टमंडळाला दिले.
शिष्टमंडळात यांचा समावेश
या चर्चेवेळी विनोद कोरेटी यांच्यासह प्रेमलाल उसेंडी,चिंताराम सोनफूल, अविनाश हारामी, ईश्वर कोरेटी, रामलाल मुलेटी उपस्थित होते. बससेवा सुरू झाल्याशिवाय पाठपुरावा थांबवणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

