
नितेश गट्टीवार गडचिरोली:
नक्षल चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ दरम्यान ८ नक्षल्यांना अटक करण्यात आली. ३८ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या ५ नक्षल्यांनी शनिवारी (दि.१६) पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. यामुळे गडचिरोली जिल्हा आता पूर्णत: नक्षलमुक्त झाला आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक १० चा विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको आणि याच कंपनीची सदस्य असलेली त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला, कंपनी सदस्य जयराम गावडे, मुकेश अवलाम, विजय तामो, रजिता मडावी, ज्योती पोटावी आणि आमती पोडियाम यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण ६४ लाख रुपयांचे बक्षीस होते. शिवाय त्यांच्याकडून ६५ लाख ३४ हजार रुपये एवढी रोख रक्कम आणि एके-४७, एसएलआर व अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत.

७ फेब्रुवारी २०२६ ला भामरागड तालुक्याच्या सीमावर्ती भागातील फोदेवाडा गावानजीकच्या जंगलात झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला होता. त्याच्या हत्येत अटकेतील काही नक्षल्यांचा सहभाग होता. यातील ४ जणांना तेलंगणातून, दोघांना कुमनार येथून आणि नैताळा येथून दोन जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक एम.रमेश यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत सांगितलं.
५ नक्षल्यांचे आत्मसमर्पण
आज ५ जहाल नक्षल्यांनी पोलिस अधीक्षकांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रिय समिती सदस्य आणि दोन दलम सदस्यांचा समावेश आहे. शासनानं त्यांच्यावर एकूण ३८ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. मधु उर्फ राकेश वेळदा, जीवन उर्फ जग्गू मडकाम, रजनी उर्फ दुर्गा धुर्वा, मंगली कुरसाम, लक्ष्मी पुनेम अृशी आत्मसमर्पित नक्षल्यांची नावे आहेत.
गडचिरोली जिल्हा झाला नक्षलमुक्त
८ नक्षल्यांना अटक आणि ५ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्यानं गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल्यांविरुद्धचा सशस्त्र संघर्ष संपला, असं पोलिस अधीक्षक एम.रमेश यांनी सांगितलं. मात्र, विचारधारा संपली असं म्हणू शकत नाही. त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये, यासाठी पोलिस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील, असही रमेश यांनी स्पष्ट केलं.

