
नितेश गट्टीवार गडचिरोली : गडचिरोली- अमीर्झा मार्गावर एका जंगली हत्तीने अचानक दर्शन दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपातून थेट मुख्य रस्त्यावर आलेल्या या हत्तीमुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हत्तीला पाहून दुचाकीस्वारांची गाळण:
मिळालेल्या माहितीनुसार, अमीर्झा रोडवरून प्रवास करणाऱ्या काही दुचाकीस्वारांना अचानक रस्त्याशेजारी हत्ती उभा असलेला दिसला. हत्तीचा आक्रमक अवतार पाहून काही प्रवाशांनी जागेवरच दुचाकी थांबवल्या, तर काहींनी भीतीपोटी आपली वाहने रस्त्यावरच टाकून मागच्या दिशेने धूम ठोकली..

नागरिकांची धावपळ आणि आरडाओरडा:
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, हत्ती मुख्य रस्त्यावर आल्यानंतर तेथून जाणाऱ्या महिला आणि पुरुषांनी जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या आणि रस्त्याच्या दिशेने पळ काढला. काही तरुण हत्तीला पाहून आरडाओरडा करत इतरांना सावध करत होते. या धावपळीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
वन विभागाला सतर्क राहण्याचे आवाहन:
या भागात गेल्या काही दिवसांपासून हत्तींचा वावर वाढल्याचे बोलले जात आहे. मुख्य रस्त्यावरच हत्ती आल्यामुळे या मार्गावरील प्रवास आता धोकादायक बनला आहे. वन विभागाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन हत्तीला मानवी वस्ती आणि मुख्य रस्त्यापासून दूर हुसकावून लावावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. तसेच, नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना काळजी घ्यावी आणि हत्ती दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला चिडवण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

