
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.९ मे:
प्रस्तावित विमानतळासाठी हिरापूर, गुरवळा, राखी आणि शिरपूर परिसरातील सुपीक जमिनींचे सर्वेक्षण सुरू करण्याच्या हालचालींविरोधात गडचिरोली येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवजी किरसान व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली.
महेंद्र ब्राम्हणवाडे म्हणाले की, गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्यानंतर आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींवर शासनाचा डोळा आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याचा प्रयत्न सुरू असून, हिरापूर, गुरवळा, राखी आणि शिरपूर परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी याला तीव्र विरोध करत आहेत. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणतेही सर्वेक्षण अथवा जमीन अधिग्रहण करू दिले जाणार नाही, असा ठाम इशारा त्यांनी दिला.

ते पुढे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्याने अनेक वर्षे नक्षलवादाचा सामना केला. आता परिस्थिती सामान्य होत असताना शासनाने जिल्ह्याच्या विकासासाठी शाश्वत उपाययोजना करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. विकासाच्या नावाखाली गरीब शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल, तर काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.
हिरापूर, गुरवळा, राखी आणि शिरपूर या गावांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहेत. या भागातील जमीन अत्यंत सुपीक असून भात, कापूस आणि विविध पिकांचे उत्पादन येथे घेतले जाते. विमानतळासाठी जमीन अधिग्रहित झाल्यास अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल. “आमच्या जमिनी म्हणजे आमचे जीवन आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही,” अशी भावना शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
यावेळी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनीही पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या जमिनींचे महत्त्व शासनाने समजून घेतले पाहिजे, असे ते म्हणाले. विकास आवश्यक असला तरी तो शेतकऱ्यांवर अन्याय करून होऊ नये. स्थानिक नागरिकांच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
तसेच उपजिल्हाधिकारी यांच्याकडेही शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात हिरापूर, गुरवळा, राखी आणि शिरपूर येथील सुपीक जमिनी विमानतळासाठी अधिग्रहित करू नयेत, पर्यायी जागेचा विचार करावा आणि शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी करण्यात आली.

