
गोंदिया – भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या आदिवासी जनसंवाद यात्रेनिमित्त गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे भाजपा आदिवासी मोर्चाची संघटनात्मक जिल्हास्तरीय बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत आगामी राजकीय घडामोडी, पक्ष संघटन मजबुती, बूथ समीकक्षीकरण, जनगणना तसेच आदिवासी समाजाशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीला देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. संजयजी पुराम, भाजपा जिल्हाध्यक्ष सौ. सीता रहांगडाले, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष ॲड. येसुलाल उपराडे, भाजपा जिल्हा महामंत्री मा. नरेंद्र बाजपेयी, माजी आमदार मा. भेरसिंह नागपूरे, जिल्हा परिषद गोंदियाच्या समाजकल्याण सभापती मा. सौ. रजनी मिलींद कुंभरे, भाजपा आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष मा. हनवंत वट्टी, पंचायत समिती सडक अर्जुनीचे सभापती मा. चेतन वळगाये, देवरी नगराध्यक्ष तथा मंडळ अध्यक्ष मा. संजय उईके, ग्रामीण मंडळ अध्यक्ष आमगाव ॲड. राजेश हरिणखेडे, मा. सौ. योगिता पुंडे, भाजपा शहराध्यक्ष आमगाव मा. मनोज सोमवंशी, आदिवासी मोर्चा महामंत्री मा. विलास वट्टी यांच्यासह भाजपा व आदिवासी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. त्यांनी आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाने जागरूक राहून आपली योग्य माहिती नोंदविण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच एस.आर.आय., आदिवासी समाजाचे प्रश्न, पक्ष संघटन बळकटीकरण आणि बूथ स्तरावर सक्षम कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

माजी आमदार डॉ. होळी यांनी भाजपा आदिवासी मोर्चाच्या पंचसूत्री कार्यक्रमाचा उल्लेख करत कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संवर्धन, नागरी कर्तव्य व स्वजागृती या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ समीकक्षीकरण अधिक प्रभावीपणे राबवून प्रत्येक बूथवर पक्ष संघटन मजबूत करण्याचे निर्देशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.
बैठकीत उपस्थित मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त करत आदिवासी समाजाच्या विकासासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन भाजपा आदिवासी मोर्चा गोंदिया जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले होते. बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये आगामी संघटनात्मक कार्यक्रमाबाबत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

