
चामोर्शी येथील कार्मेल हायस्कूलची समृद्धी बोनगिरवार ९७.२० टक्के गुणासह जिल्हात अव्वल
नितेश गट्टीवार गडचिरोली: शैक्षणिक प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण तब्बल १० टक्क्यांनी अधिक आहे.चामोर्शी येथील कार्मेल हायस्कूलची समृद्धी बोनगिरवार ९७.२० टक्के गुणासह जिल्हात अव्वल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात गडचिरोली जिल्ह्यातील ८२.१८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शैक्षणिक प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण तब्बल १० टक्क्यांनी अधिक आहे.
नागपूर विभागात जिल्हा शेवटच्या स्थानी

जिल्ह्याच्या एकूण निकालात गतवर्षीच्या तुलनेत किंचित घसरण झाली असून, नागपूर विभागात गडचिरोली जिल्हा पुन्हा एकदा सर्वात शेवटच्या स्थानी फेकला गेला आहे. विशेष म्हणजे बारावीच्या निकालातही जिल्हा शेवटच्या स्थानी होता, त्यामुळे आता शिक्षण विभागाची चिंता वाढली आहे.
आकडेवारी : विशेष प्राविण्य आणि श्रेणीनिहाय यश
जिल्ह्यातून यंदा १४ हजार ४१४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी १४ हजार ७६ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला सामोरे गेले. यामध्ये ७ हजार १२५ मुले आणि ६ हजार ९५१ मुलींचा समावेश होता. जाहीर झालेल्या निकालानुसार, ११ हजार ५६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यात मुलींच्या यशाची टक्केवारी ८७.०९ इतकी आहे, तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ७७.४० टक्क्यांवर स्थिरावले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी १,३५७ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून ‘विशेष प्राविण्य’ श्रेणीत स्थान मिळवले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांमध्ये ३,९२८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४,७८२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १,५०२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.
तालुकानिहाय कामगिरी : आरमोरी अव्वल, मुलचेरा तळाला
तालुकानिहाय निकालाचा विचार करता, आरमोरी तालुक्याने ८५.२० टक्के निकालासह जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ अहेरी (८४.९३ टक्के), देसाईगंज (८३.९९ टक्के) आणि गडचिरोली (८३.९६ टक्के) या तालुक्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. दुसरीकडे, मुलचेरा तालुक्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ७६.४० टक्के लागला असून तो जिल्ह्यात सर्वात शेवटी आहे. एटापल्ली (७७.९७ टक्के) आणि सिरोंचा (७८.६७ टक्के) या दुर्गम तालुक्यांची कामगिरीही सरासरीपेक्षा कमी राहिली आहे.
निकालाचा घसरता आलेख आणि आव्हाने
जिल्ह्याच्या गेल्या तीन वर्षांतील निकालाच्या आलेखावर नजर टाकल्यास शैक्षणिक घसरण स्पष्टपणे दिसून येते. २०२४ मध्ये जिल्ह्याचा निकाल ९४.६७ टक्के इतका विक्रमी लागला होता, मात्र २०२५ मध्ये तो ८२.६७ टक्क्यांपर्यंत खाली आला आणि यंदा तो आणखी घसरून ८२.१८ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, दहावीच्या पुनर्परीक्षेला बसलेल्या ४५६ विद्यार्थ्यांपैकी १२९ जण उत्तीर्ण झाले असून, यात ७५ मुले व ५४ मुलींनी यश संपादन केले आहे. नागपूर विभागातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्याला आपले स्थान उंचावण्यासाठी अद्याप मोठी मजल मारावी लागणार असल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे.

