
नितेश गट्टीवार गडचिरोली/मुंबई दि.२२:
मुंबई येथे माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेत गडचिरोली जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाच्या व्यापक विकासासंदर्भात सविस्तर चर्चा केली. या भेटीत गडचिरोली जिल्ह्यातील कोटगल, चिंचडोह, दिना प्रकल्प तसेच गोसिखुर्द धरणालगत असलेल्या शासकीय जमिनीवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गोड्या पाण्यातील मासे उत्पादन केंद्र (फिश पॉईंट) उभारण्याची मागणी माजी आमदार डॉ. होळी यांनी केली.
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंपत्ती उपलब्ध असून तलाव, धरणे, सिंचन प्रकल्प आणि नदीकाठच्या भागांचा योग्य वापर केल्यास मत्स्य व्यवसायातून हजारो युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. जिल्ह्यातील बेरोजगार युवक, महिला बचत गट, शेतकरी व आदिवासी बांधवांना मत्स्यपालन प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करण्याची गरज आहे. यासाठी शासनाने विशेष योजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी मंत्री नितेश राणे यांनी सदर प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत गडचिरोली जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना तसेच धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत विविध प्रकल्प राबविण्याबाबत होकार दर्शविला. मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच मत्स्य उत्पादन, मासे प्रक्रिया उद्योग, थंड साखळी व्यवस्था, मत्स्य बियाणे केंद्र, आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञान, तलाव विकास, मत्स्य विक्री केंद्र, मत्स्य सहकारी संस्था बळकटीकरण आणि स्थानिक युवकांना प्रशिक्षण यावरही सविस्तर चर्चा झाली. विदर्भात या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मंत्री नितेश राणे यांनी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्यावर सोपविल्याचे सांगितले जाते.
माजी आमदार डॉ. होळी यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाची मोठी क्षमता असून योग्य नियोजन केल्यास हा उद्योग जिल्ह्याच्या अर्थकारणाला नवी दिशा देऊ शकतो. मत्स्य व्यवसायामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार, शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न, महिलांना स्वयंरोजगार आणि युवकांना उद्योग संधी उपलब्ध होतील. शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
या भेटीमुळे गडचिरोली जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय विकासाच्या नव्या आशा निर्माण झाल्या असून भविष्यात जिल्ह्यात आधुनिक मत्स्य प्रकल्प उभारले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

