
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.२१ एप्रिल:
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद गडचिरोलीची जिल्हास्तरीय आढावा बैठक सर्किट हाऊस, नवेगाव कॉम्प्लेक्स येथे आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. बैठकीत संघटन विस्तार, सदस्य नोंदणी, राज्यस्तरीय अधिवेशनाची तयारी तसेच समाजातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे, जिल्हा महासचिव उमेश उईके यांची उपस्थिती लाभली. यावेळी जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला. तसेच नव्या कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देत विविध पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये पवन गेडाम यांची गडचिरोली जिल्हा संघटक, तेजराम रायसिडाम यांची गडचिरोली तालुका उपाध्यक्ष, ओंकार वेटे यांची गडचिरोली शहर सचिव, नितीन नैताम यांची गडचिरोली शहर संघटक, शालिनी पेंदाम यांची गडचिरोली महिला तालुका उपाध्यक्ष तसेच रोहिणी मसराम यांची गडचिरोली महिला शहर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
बैठकीत आदिवासी विकास परिषदेच्या सदस्य नोंदणी मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. गावागावात संघटन पोहोचवून अधिकाधिक युवक, महिला व समाजबांधवांना परिषदेशी जोडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच आगामी राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजन, उपस्थिती व जबाबदाऱ्या यावर चर्चा झाली.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व रोजगाराशी निगडित प्रश्नांवर परिषदेमार्फत प्रभावी काम करण्याची गरज व्यक्त केली. संघटन मजबूत झाल्यास समाजातील अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात, असे त्यांनी सांगितले.
महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे यांनी महिला सक्षमीकरणासाठी विकास परिषदेच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, स्वावलंबन आणि महिलांना नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.
जिल्हा महासचिव उमेश उईके यांनी गडचिरोली जिल्ह्यातील कामकाजाचा सविस्तर आढावा वाचून दाखविला तसेच बैठकीचे सूत्रसंचालन केले.
बैठकीस जिल्हा सचिव सुरज मडावी, महिला जिल्हा सचिव विद्या दुग्गा, नवनियुक्त जिल्हा संघटक पवन गेडाम, गडचिरोली तालुका अध्यक्ष तुषार मडावी, धानोरा तालुका अध्यक्ष दिलीप गावडे, गडचिरोली महिला तालुका अध्यक्ष लीना कोकोडे, शहर अध्यक्ष निलेश आत्राम, महिला शहर अध्यक्ष आरती कोल्हे, हर्षद पेंदाम, श्याम सलामे, अनिकेत गेडाम, नलिनी कोवे, निकिता कुमरे, सचिन भोयर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीमुळे गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास परिषदेचे संघटन अधिक बळकट होणार असून समाजहिताच्या विविध उपक्रमांना गती मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

