
नितेश गट्टीवार गडचिरोली:
दुर्गम भागातील शाळांच्या वेळेबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याने जिल्हा प्रशासनाने आता शिक्षकांवर कडक पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. शाळा सुरू होताना आणि बंद होताना ‘नोट कॅम’द्वारे जिओ टॅगिंग (Geo-Tagging) फोटो पाठवण्याचे आदेश असतानाही, अनेक शिक्षक या फोटोंमध्ये तांत्रिक फेरफार करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कठोर पाऊल उचलले असून संबंधित शिक्षकांची ‘गोपनीय चौकशी’ करण्याचे आदेश दिले आहेत.
नेमका प्रकार काय?

जिल्हा प्रशासनाने शाळांच्या उपस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दररोज शाळा उघडताना आणि बंद करतानाचे जिओ टॅगिंग फोटो व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवणे बंधनकारक केले होते. मात्र, काही शिक्षक शाळा सुटण्यापूर्वीचे किंवा जुन्या वेळेचे फोटो ‘एडिट’ करून चुकीच्या पद्धतीने प्रशासनाला पाठवत असल्याचे निदर्शनास आले आहे. तंत्रज्ञानाचा आधार घेऊन प्रशासनाची दिशाभूल करण्याचा हा प्रकार अत्यंत गांभीर्याने घेण्यात आला आहे.
बुधवारी होणार शाळांची गोपनीय चौकशी
ज्या शाळांचे फोटो संशयास्पद आढळले आहेत किंवा जिथे वेळेचे पालन होत नसल्याच्या तक्रारी आहेत, अशा शाळांना दर बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ‘गोपनीय भेटी’ देण्यात येणार आहेत. या प्रत्यक्ष चौकशीत जर शिक्षकांचे गैरवर्तन किंवा गैरहजेरी आढळली, तर त्यांच्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
पर्यवेक्षकीय यंत्रणाही रडारवर
केवळ शिक्षकच नव्हे, तर आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरणाऱ्या केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे. कर्तव्यात कसुरी करणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांविरुद्धही प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे संकेत देण्यात आले आहेत.
“काही शिक्षक शाळेत उशिरा पोहोचत असल्याची बाब लक्षात आली आहे. पालकांच्या तक्रारी वाढल्याने शाळा उघडणे व बंद केल्याचे फोटो मागितले जात आहेत.”
— बाबासाहेब पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
ठळक बाबी:प्रशासनाची फसवणूक: एडिट केलेले फोटो पाठवून वेळेची खोटी माहिती देणे.कठोर कारवाई: फोटोत फेरफार करणाऱ्या आणि दांडी मारणाऱ्या शिक्षकांविरुद्ध कडक पावले.आकस्मिक भेटी: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जिल्हयातील शाळांची अचानक तपासणी.

