
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.१९ एप्रिल :
भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी जनसंवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर दि. 25 एप्रिल 2026 रोजी गडचिरोली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बैठकीच्या तयारीसाठी आज दि. 19 एप्रिल 2026 रोजी गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात नियोजन बैठक पार पडली.
या बैठकीस भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. बैठकीत आगामी जिल्हास्तरीय बैठकीचे नियोजन, कार्यकर्त्यांची उपस्थिती, संघटन बळकटीकरण, आदिवासी समाजाशी संवाद वाढविणे तसेच पक्षाच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आदिवासी समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच समाजातील युवक, महिला व शेतकरी वर्गाशी थेट संवाद साधण्यासाठी जनसंवाद यात्रा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, तालुका अध्यक्ष लोमेश कुळमेथे, विनय मडावी, विजय शेडमाके तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी 25 एप्रिल रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय बैठकीस मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

