
नितेश गट्टीवार गडचिरोली/चामोर्शी दि.२० एप्रिल:
तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या चामोर्शी शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून येथील अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी काँग्रेस सोशल मीडियाचे प्रमुख विजय लाड यांनी केली आहे.
तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे शहरात खेड्यापाड्यातून नागरिक दररोज ये जा करीत असतात. दर गुरुवारी चामोर्शी येथे आठवडी बाजार भरत असते. परंतु बाजार रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केले असल्याकारणाने आठवडी बाजाराला रस्त्याने ये जा करताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गुरुवारला या मार्गाने जड वाहनांना बंदी घालण्यात यावी.

काही दुकानदारांनी रस्त्यावरच शेड, साहित्य ,बोर्ड टाकून उघडपणे अतिक्रमण केले आहे. नाल्यांच्या बाहेरपर्यंत सामान मांडल्यामुळे रस्ता पूर्णपणे अरूंद झाला आहे. पादचारी विद्यार्थी महिला आणि रुग्णवाहिका यांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे . प्रशासन मात्र या सर्व प्रकारांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याकडे संबंधित विभागाने लक्ष केंद्रित करून शहरातील अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख विजय लाड यांनी दिला आहे.

