
नितेश गट्टीवार गडचिरोली/चामोर्शी दि.१० एप्रिल:
चामोर्शी तालुक्यातील अनखोडा आणि मुरखळा (माल) या दोन गावांनी जिल्हा पोलीस भरतीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर या दोन्ही गावांतील एकूण १२ उमेदवारांची पोलीस दलात निवड झाली आहे.
अनखोडा या गावातील एकाच वेळी ८ उमेदवारांची निवड होऊन गावाने यशाचा झेंडा रोवला आहे. मुरखळा (माल) या गावातील ४ उमेदवारांची निवड झाली असून, या गावातील एकूण पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आता १४ वर पोहोचली आहे.

पोलीस भरतीत निवड झालेल्यां १२ मध्ये मेघा निमसरकर, श्रुती गुरुकार, साक्षी कोसरे, डिंपल खरबनकर, सानिका चहारे, अरविंद तिमाडे, संकेत कोहपरे, जॉकी निमसरकर, मिलिंद गद्वारे, प्रभात बुरे, चंद्रशेखर सोमनकर आणि पल्लवी काकडे आदींचा समावेश आहे.
निवड झालेल्यांपैकी बहुतांश तरुण शेतकरी कुटुंबातील असून, त्यांनी ग्रामीण भागातील मर्यादित सोयी-सुविधांवर मात करत हे यश संपादन केले आहे. काही उमेदवारांनी आपल्या पोलीस वडिलांचा वारसा पुढे चालवत खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण केले आहे.
निवड झालेल्या सर्व सुपुत्रांचे आणि सुकन्यांचे सर्वत्र कौतुक होत असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

