
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.८ एप्रिल :
राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रात सक्षम करण्यासाठी स्वतंत्र राज्यस्तरीय पीएच.डी. फेलोशिप योजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दूध विकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री मा. अतुल सावे यांच्याकडे करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील अनेक दिव्यांग विद्यार्थी पीएच.डी. स्तरावर संशोधन करत असले तरी आर्थिक अडचणी, अपुरी शैक्षणिक साधने व सुविधांच्या अभावामुळे त्यांना संशोधन पूर्ण करण्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध फेलोशिप योजना उपलब्ध असताना, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र राज्यस्तरीय योजना नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी संशोधन स्तरावरील ठोस धोरणाचा अभाव असून, उच्च शिक्षणात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र ‘रिसर्च पॉलिसी’ तयार करणे आवश्यक आहे. तसेच OBC, SC, ST प्रवर्गांप्रमाणेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीही समर्पित संशोधन फेलोशिप योजना सुरू करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.सध्या उपलब्ध योजनांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना मर्यादित लाभ मिळत असल्यामुळे त्यांचे संशोधन कार्य प्रभावीपणे पुढे नेता येत नसल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
हे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी नितीन गावडे यांच्या मार्फत सादर करण्यात आले असून, शासनाने यावर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
NSUI उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, तालुकाध्यक्ष कुषभ मेषाखेत्री, गितेश तेल्कापल्लीवार, प्रीतम पांढरे,प्रशांत कुसराम, इरफान शेख,तसेच NSUI चे कार्यकर्ते उपस्थित होते.

