
गडचिरोली दि.३१ मार्च :
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत देशातील माओवादी चळवळीचा अस्त झाल्याची घोषणा केल्यानंतर आज एकूण ३० लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या ९ नक्षल्यांनी आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी भारताचं संविधान देऊन त्यांचा सत्कार केला.
आत्मसमर्पण करणारे सर्व नक्षलवादी छत्तीसगडमधील इंद्रावती क्षेत्रिय समिती आणि नॅशनल पार्क क्षेत्रिय समितीत कार्यरत होते. या ९ जणांपैकी तिघे जण क्षेत्रिय समिती सदस्य होते. सध्या गडचिरोली जिल्ह्यात ६ सशस्त्र नक्षली शिल्लक आहेत. त्यातील एक जण गडचिरोली जिल्ह्याचा, तर अन्य पाच जण छत्तीसगडचे रहिवासी आहेत.

मात्र, त्यांच्या कुठल्याही हालचाली गडचिरोली जिल्ह्यात दिसत नाही, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितलं. या नक्षल्यांनी आत्मसमर्पण करावं, अन्यथा सशस्त्र कारवाईला सामोरे जावं लागेल, असा इशारा नीलोत्पल यांनी दिला.

