
नितेश गट्टीवार,
गडचिरोली दि.३० मार्च:
गडचिरोली जिल्ह्यात उद्योग उभारणीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी या प्रक्रियेला जोरदार विरोध दर्शविला असून, त्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेल्या जमिनी हिरावल्या जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शासनाकडून विविध मार्गांनी जमीन अधिग्रहण प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न होत आहे.
या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिक चिघळू नये आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस विधिमंडळ गटनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, आमदार रामदास मसराम, जिल्हाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडलावार, जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव ऍड. विश्वजीत कोवासे यांच्यासह जिल्ह्यातील विविध भागांतून आलेले शेतकरी, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना आणि अडचणी प्रशासनासमोर मांडत जमीन अधिग्रहण प्रक्रिया तात्काळ थांबवावी किंवा शेतकऱ्यांच्या संमतीनेच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

