
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
चामोर्शी, दि. ९ जुलै : चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत भाडभिडी (मो.) अंतर्गत येणाऱ्या नवतळा (तु.) येथे विजेचा धक्का लागून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत महिलेचे नाव चंद्रकला सुकरू धुळेवार (वय ५२) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकला धुळेवार या गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या दरम्यान नेहमीप्रमाणे घराबाहेर दोरीवर कपडे वाळत घालत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का लागला. त्या गंभीर जखमी होऊन खाली कोसळल्या.

घटनेच्या वेळी घराशेजारी असलेल्या त्यांच्या मुलाने आईला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यालाही विजेचा धक्का बसला. सुदैवाने त्याला गंभीर दुखापत झाली नाही. जखमी अवस्थेतील चंद्रकला धुळेवार यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, कुनघाडा (रै.) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेच्या वेळी त्यांचा एक मुलगा शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी गेला होता, तर पती कामानिमित्त बाहेरगावी असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर गावालगतच्या स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

