News Jagar

सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली.
गडचिरोली जिल्ह्याकरीता अतिरिक्त सुसज्ज बसेस उपलब्ध करून चालक वाहकांची तातडीने भरती करा…
अन्यथा आंदोलन करण्याचा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचा इशारा….

गडचिरोली :- गडचिरोली हा अतिदुर्गम व मागास जिल्हा असून येथे एसटी बसेस व्यतिरिक्त इतर कोणतेही शासकीय दळणवळणाचे साधन उपलब्ध नाही. त्यामुळे येथील नागरिकांना प्रवासाकरिता एसटी बसेस हा एकमेव आधार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस गावोगावी बस पोहोचल्याची प्रसिद्धी करतात, ज्या गावात अजून पर्यंत बस पोहोचवली नाही. त्या गावात बस पोहोचत आहे याचा आनंद आहे, मात्र अपुरे चालक व वाहक यामुळे अनेक गावात, जुन्या बसेस नियोजीत वेळापत्रकानुसार नियमित व वेळेत धावत नाहीत. काही ठिकाणच्या बसेस सुद्धा बंद करण्यात आलेले आहेत. ही वस्तुस्थिती असून उपलब्ध बसांपैकी अनेक ST बसेसची दयनीय अवस्था झालेली आहे, नुकत्याच घडलेल्या घटनेत गडचिरोली बसस्थानकावर एका जीर्णावस्थेतील बसने महिलेला धडक देऊन इजा पोहोचवली तर बरेच वेळा अचानक रस्त्यावरच खराब झालेल्या बसेसमुळे नागरिकांना तात्काळत रस्त्यावर राहावे लागत असल्याचे व्हिडिओ, छायाचित्र सुद्धा सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमातून पुढे येत असतात. या सर्व परिस्थितीमुळे नागरिक, विद्यार्थी, रुग्ण व शेतकरी यांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. शासनाने व स्वतः राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गडचिरोली जिल्ह्याला अतिरिक्त सुसज्ज अशा बसेस उपलब्ध करून द्याव्या व तातडीने रिक्त असलेल्या चालक व वाहकांची पदभरती करावी. एसटी सेवा नियोजित वेळेनुसार नियमित सुरु ठेवावी, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून केली आहे, या मागण्यांची पूर्तता न झाल्यास येणाऱ्या काळात मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिला आहे केली. NewsJagar

