
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची : येथील वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय कोरचीच्या मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. आर. एस. रोटके होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सी. एस. मांडवे यांची उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रा. एस. एस. दोनाडकर व प्रा. पी. के. चापले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मराठी भाषेच्या गौरवगीताने झाली.

प्रास्ताविकात प्रा. एस. एस. दोनाडकर यांनी मराठी भाषेचा इतिहास, समृद्ध साहित्यपरंपरा आणि आजच्या काळातील मराठी भाषेचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या संस्कृतीची, अस्मितेची व परंपरेची जपणूक करणारी शक्ती आहे, असे त्यांनी नमूद केले.
प्रमुख मार्गदर्शक प्रा. सी. एस. मांडवे यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. आर. एस. रोटके यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी वाचनसंस्कृती जोपासावी, मराठी साहित्याचा अभ्यास करावा व भाषेचा अभिमान बाळगावा, असे प्रतिपादन केले. #Newsjagar
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कु. समरिधी कावळे यांनी सुरेखरीत्या केले, तर आभार प्रदर्शन कु. निशा मुलेटी यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

